छत्रपती संभाजीनगर : आंदोलनावेळी मुलांवर जे फायरिंग झालं, त्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह जबाबदार आहेत. त्यांचा राजीनामा झालाच पाहिजे, अशी मागणी कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दीपके यांनी केली. आज छत्रपती संभाजीनगरमध्ये त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी विविध मुद्द्यांवर अभिजीत दीपके यांनी भाष्य केले. कॉकरोच जनता पार्टीला बाहेरून फंडिंग येत आहे असे जर सरकार म्हणत असेल तर हे त्यांचे फेल्युअर आहे. तुम्ही सत्तेत असताना आम्हाला फंडिंग कसे झालं?, असा सवालही अभिजीत दीपके यांनी उपस्थित केला आहे.
आता जे केंद्रीय शिक्षणमंत्री आहेत, ते अत्याचाराचे समर्थन करतात. धर्मेंद्र प्रधानांना पदावरून काढून आणखी एक विचित्र माणूस पदावर बसवला. यांच्याकडे सगळेच लोक तसे आहेत. त्यांच्याकडे पर्याय काय आहे?, असंही अभिजीत दीपके म्हणाले. जेन झीला ट्रोल करून काय मिळणार...हीच मुले उद्या देश चालवणार..ही मुले सामान्य घरातली आहेत, असे अभिजीत दीपके यांनी सांगितले. तसेच मी स्वतः शेतकरी घरातून आलो आहे. जेव्हा जेव्हा गरज असेल, तेव्हा तेव्हा आम्ही शेतकर्यांच्या सोबत उभे राहू, असेही अभिजीत दीपके यांनी स्पष्ट केले.
ऑफर आली तरी मी भाजपमध्ये जाणार नाही
मला कितीही वेळा भाजपकडून ऑफर आली, तरी मी भाजपमध्ये जाणार नाही. मला धमक्या येतायत की भाजपमध्ये या, तुमच्यासाठी चांगलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे त्यांच्या नातवाच्या वयाच्या लोकांना धमकावत आहेत, त्यांना लाज वाटायला पाहिजे, असा आरोपही अभिजीत दीपके यांनी केला. कोणत्याही एका माणसाला मोठं करू नये. २०१४ साली एक माणूस सत्तेत आला आणि तेव्हापासून देशात बेरोजगारी, महागाई, शेतकरी प्रश्नांवर कुणीच बोलत नाही, असंही अभिजीत दीपके म्हणाले.
पोलिसांनी एकतर संविधान फॉलो करावं, नाहीतर खाकी पँट काढून, मग खाकी चड्डी घालावी
आम्ही आंदोलन केलं तेव्हा आमच्यावर २४ तास कॅमेरे होते. पोलिसांचे, मीडियाचे सगळेच कॅमेरे होते. आता पोलिसांनी जर कॅमेरापासून घाबरण्याची एसओपी बनवली असेल तर त्यांची चूक असेल. पोलिसांनी एकतर संविधान फॉलो करावं, नाहीतर खाकी पँट काढून, मग खाकी चड्डी घालावी आणि भाजपच्या मुख्यालयाच्या समोर घोषणाबाजी करावी, अशी टीका अभिजीत दीपके यांनी केली. आंदोलनाच्या आधीच पाहिले होते दगडांनी भरलेला ट्रक आणू ठेवला होता, हे मी स्वत: पाहिले. दगडांनी भरलेला ट्रक मुख्य दिल्लीत आला कसा? एक फुटलेली व्हॅन उभी करायची...हा सगळा पोलिसांचा आधीपासूनचा प्लॅन होता की नंतर विद्यार्थ्यांवर उलटवायचं, असा दावाही अभिजीत दीपकेंनी केला आहे.